नेवासा येथे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म सोहळा पुष्पवृष्टीने साजरा

नेवासा(प्रतिनिधी)  नेवासा येथे संत तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज मंदिर प्रांगणात महंत गुरुवर्य श्री उध्दवजी महाराज मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली भागवताचार्य हभप अंकुश महाराज जगताप यांच्या सुश्राव्य वाणीतून सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म सोहळा संत महंतांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करून साजरा करण्यात आला.

यावेळी झालेल्या श्रीकृष्ण जन्म सोहळयाच्या प्रसंगी श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत स्वामी श्री सुनीलगिरीजी महाराज,मध्यमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी श्री ऋषिनाथजी महाराज,देवगड संस्थानचे सेवेकरी नारायण महाराज ससे,लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे,साहेबराव महाराज चावरे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी भागवताचार्य हभप अंकुश महाराज जगताप यांनी भगवान श्रीकृष्ण अवताराचा प्रसंग जन्म सोहळयाच्या प्रसंगी सांगितला.यावेळी वासुदेव बनून आलेल्या भाविकाने टोपल्यावर बालकाला बसून आणले त्यांच्या समवेत देवकी,राधा कृष्ण यांची वेशभूषा केलेल्या कलाकारांनी जन्म सोहळयात सादर केलेल्या अदाकारीने उपस्थित हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केले जन्म सोहळयाच्या प्रसंगी “किती सांगू मी सांगू कुणाला” या भक्ती गीतावर उपस्थित हजारो महिला व पुरुष भाविकांनी
तल्लीन होऊन ठेका धरला.

यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रतिमेचे पूजन व श्रीकृष्ण बनलेल्या बालकाचे औक्षण महंत सुनीलगिरी
महाराज व बालयोगी श्री ऋषिनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. सोहळयाच्या प्रसंगी पुष्पवृष्टी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी संत महंतांसह उपस्थित यजमान व दात्यांच्या हस्ते श्रीमद भागवताची महाआरती करण्यात आली.
भागवत कथेच्या प्रसंगी तबलावादक व गायनाचार्य

अमोल महाराज गोपाळ यांच्यासह सहकाऱ्यांनी उत्कृष्ट संगीत साथ केली.यावेळी शंकरराव लोखंडे,इंजिनियर सुनीलराव वाघ, ज्ञानदेव शिंदे,पोलीस पाटील अनिल माकोणे,सतीश गायके,मनोज पारखे,रामराव बोरुडे, मच्छिंद्र गव्हाणे, दिगंबर लष्करे,राजेंद्र परदेशी,दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *